चंद्रपूर :- जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना, आज आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्या सह अनेक प्रमुख विभाग प्रमुखांनी दांडी मारल्याने, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत ही बैठक तात्काळ रद्द केली. MP Pratibha Dhanorkar cancelled the road safety meeting due to the absence of officials
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय शिस्तीचा अनादर करणाऱ्या या सर्व बेजबाबदार अनुपस्थित अधिकाऱ्यांना त्वरित ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना दिले. या बैठकीला विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांची विशेष उपस्थिती होती.
बैठक रद्द केल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट शहराच्या मुख्य रस्त्यांवर उतरून पाहणी केली आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
खासदार स्वतः रस्त्यावर उतरताच प्रशासनाची धावपळ उडाली व तात्काळ ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘ट्रक टर्मिनल’साठी राखीव जागा शोधण्याचे आणि खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना स्वतःची पार्किंग व्यवस्था उभारण्यास सांगण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या अचानक दिलेल्या ‘सरप्राईज व्हिजिट’ मुळे वाहतूक पोलिसांचा सावळागोंधळ उघडा पडला.
खासदार महोदया पाहणीसाठी येत असल्याची माहिती मिळताच वाहतूक निरीक्षक बारापात्रे हे स्वतः ट्रॅव्हल्स मालकांना रस्त्यावरून गाड्या हटवण्याच्या सूचना देत असल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय आडोशाखाली चालणारा हा हलगर्जीपणा समोर आल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संबंधित यंत्रणेला चांगलेच खडे बोल सुनावले.
“जनतेच्या जीवाशी खेळणारा आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढील बैठकीत सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
या धडक कारवाईवेळी सचिव तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक अधिकारी रावसाहेब रगडे, वाहतूक निरीक्षक बारापात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व काँग्रेस नगरसेवक-पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या भूमिकेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
