चंद्रपूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून, ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रोषणाई आणि विविध देखाव्यांनी गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. मात्र, उत्सवाच्या आनंदात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. वीज चोरांना महावितरणचा शॉक…….
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात पार पडावा, यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीकरिता घरगुती वीजदर लागू केले आहेत. त्यामुळे मंडळांनी अनधिकृत वीजजोडण्या न घेता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. SIR और नागरिकता की लडाई…..
‘हुक’ टाकून वीज घेणे टाळा
मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रमांसाठी लागणारी विद्युत व्यवस्था केवळ अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. रोषणाई अथवा देखावे उभारताना वीजवाहिन्या, विद्युत खांब आणि वितरण रोहित्रांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.
वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रलची व्यवस्था करावी. यामुळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होऊन होणारे संभाव्य अपघात टाळता येतील. जवळच्या वीज खांबांवर अथवा वाहिन्यांवर ‘हुक’ टाकून वीज घेण्याचा प्रकार करू नये, कारण अशा अनधिकृत जोडण्यांमुळे जीवित व वित्तहानीचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शासकीय रुग्णालयातील सुविधांवर ऑन द स्पॉट आढावा…..
जुनी, तुटलेली वायर वापरू नका
वीज जोडणीसाठी वापरण्यात येणारी तार अथवा केबल अपेक्षित विद्युत भार पेलण्यास सक्षम आहे, याची खात्री करावी. जुनी, झिजलेली किंवा तुटलेली वायर वापरणे टाळावे. सर्व विद्युत उपकरणांचे योग्य अर्थिंग करण्यात आले आहे की नाही, याची खात्री करून त्याची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच एका मल्टी-प्लगवर अनेक विद्युत उपकरणे जोडणे टाळावे, असेही महावितरणने सांगितले आहे.
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी विशेष शिबिरे
गणेशोत्सव मंडळांच्या सोयीसाठी महावितरणच्या सर्व कार्यालयांतर्फे विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून, तात्पुरत्या वीजजोडणीसाठी आवश्यक ती मदत मंडळांना दिली जात आहे. यासाठी मंडळांनी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी, पोलीस परवाना आणि विद्युत निरीक्षकांचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, तात्पुरत्या वीजजोडणीसाठी भरलेली अनामत रक्कम विनाविलंब परत केली जाणार आहे. मंडळांनी ही रक्कम ऑनलाइन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम तत्काळ परत दिली जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
आणीबाणीच्या वेळी या क्रमांकांवर संपर्क
वीजविषयक कोणतीही आणीबाणी अथवा समस्या उद्भवल्यास गणेशोत्सव मंडळांनी महावितरणच्या २४ तास सुरू असलेल्या १९१२, १९१२०, १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच संबंधित भागातील महावितरण अभियंत्यांचे मोबाईल क्रमांकही मंडळांनी जवळ ठेवावेत.
बाप्पाच्या स्वागताचा उत्साह कायम ठेवताना वीज सुरक्षेची काळजी घेऊन जबाबदार आणि सुरक्षित गणेशोत्सव मंडळाची ओळख निर्माण करा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
