Tuesday, July 14, 2026
HomeMaharashtra२४ तासांत थकीत वेतन; धानोरकरांचा यशस्वी पाठपुरावा

२४ तासांत थकीत वेतन; धानोरकरांचा यशस्वी पाठपुरावा

Sanitation workers receive outstanding wages within 24 hours

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिके अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी नालेसफाई कामगारांच्या थकीत वेतनाची आणि त्यांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याची गंभीर समस्या अखेर निकाली निघण्याच्या मार्गावर आहे.

भारतीय कष्टकरी जनसंघाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज थेट महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कामगारांवर होत असलेला अन्याय तात्काळ दूर करून त्यांना न्याय देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

खासदार महोदयांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर मनपा आयुक्तांनी कंत्राटी कामगारांचे २ महिन्यांचे प्रलंबित वेतन २४ तासांच्या आत जमा करण्याचे आणि लवकरच नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.

यावेळी नगरसेवक सुरेंद्र अडबाले, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक विनोद लभाने, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेविका सुनंदा धोबे, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, मिसार यांची उपस्थिती होती.

या वेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कामगारांच्या हितासाठी मनपा प्रशासनासमोर अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. जोपर्यंत नवीन कंत्राटदार येत नाही, तोपर्यंत महानगरपालिकेने स्वतः कामगारांचा पगार देऊन त्यांना शहराची स्वच्छता राखण्यासाठी कामावर कायम ठेवावे, जेणेकरून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि कामगारांचा रोजगारही बुडणार नाही. यासोबतच नालेसफाई कामगारांप्रमाणेच पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसह इतर सर्व विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ‘किमान वेतन’ लागू करून ते नियमित देण्यात यावे, अशी लोकहितकारी मागणी खासदार महोदयांनी प्रशासनाकडे लावून धरली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत नालेसफाईचे काम करणाऱ्या १७२ कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत होते. यामध्ये ‘श्री दीपक उत्तराधी’ आणि ‘संत मिराबाई सेवा सहकारी संस्था’ या कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या कामगारांचा समावेश आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता संत मिराबाई सेवा सहकारी संस्थेचे काम अचानक बंद करून १७२ कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. गेली १५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या या गरिबांवर अचानक उपासमारीची वेळ आल्यामुळे कामगारांनी ७ जुलै २०२६ पासून बेमुदत आंदोलन पुकारले होते.

या संवेदनशील प्रश्नाची माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज स्वतः पुढाकार घेत आयुक्तांची भेट घेतली आणि आरोग्याची जोखीम पत्करून काम करणाऱ्या या सफाई कामगारांचे वेतन थकवणे व त्यांना अचानक कामावरून काढणे हा त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा प्रकार असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने शहरातील सफाई व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि कामगारांना शाश्वत रोजगार देण्यासाठी लवकरात लवकर नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतलेल्या या लोकहितकारी भूमिकेमुळे, त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि त्यांनी दाखविलेल्या पाठिंब्यामुळे गरीब सफाई कामगारांनी व भारतीय कष्टकरी जनसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular