Saturday, October 24, 2026
HomeEducationalबोर्डा आश्रमशाळेत ‘सखी स्वास्थ्य अभियान'

बोर्डा आश्रमशाळेत ‘सखी स्वास्थ्य अभियान’

चंद्रपूर :- मुलींमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि स्वतःच्या शरीराविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मी टू वी फाउंडेशनच्या वतीने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बोर्डा येथील शासकीय आश्रमशाळेत ‘सखी स्वास्थ्य अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

‘Sakhi Swasthya Abhiyan’ at Boarda Ashram School;

या कार्यक्रमात चंद्रपूर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीतील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याची काळजी या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात स्वच्छता कशी राखावी, मासिक पाळीदरम्यान कोणती खबरदारी घ्यावी, आरोग्यविषयक समस्यांकडे कसे लक्ष द्यावे आणि त्यावर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला कसा घ्यावा, याबाबत त्यांनी सोप्या व सहज समजणाऱ्या भाषेत माहिती दिली.

संवादातून शंकांचे निरसन; स्वच्छता किटचे वाटप

केवळ मार्गदर्शन न करता डॉ. नायडू यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या शंका व समस्या जाणून घेतल्या. मासिक पाळी आणि वैयक्तिक स्वच्छतेविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य आरोग्यविषयक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मी टू वी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींना ‘हायजिन केअर किट’चे वाटप करण्यात आले.

मुलींना आरोग्याविषयी योग्य माहिती मिळावी, त्यांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी समजून घ्यावी आणि आत्मविश्वासाने जीवन जगावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

मान्यवरांचे सहकार्य; उपक्रमाचे कौतुक

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मी टू वी फाउंडेशनचे विश्वस्त आ. पुष्पहास बल्लाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अरविंद अग्रवाल यांचेही सहकार्य लाभले. फाउंडेशनचे आजीवन सदस्य पंकजभाऊ देशमुख, डॉ. तुषार सांबरे, सौ. तन्वी सांबरे, सागर मंडल, डॉ. विरेंद्र कोल्हे, यशोधरा कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि प्राचार्य यांनी या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

बोर्डा शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. खावशी सर आणि शिक्षकवृंद यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करून फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular