Friday, October 16, 2026
HomeBussinessचंद्रपुरात निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद संपन्न

चंद्रपुरात निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद संपन्न

चंद्रपूर :- जिल्ह्यातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे तसेच शासनाच्या विविध निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने ‘निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास’ या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे ‘निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद -2026’ उत्साहात संपन्न झाली. Export Awareness Camp and E-commerce Summit Held in Chandrapur

विदेश व्यापार महासंचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या परिषदेला जिल्ह्यातील आयात-निर्यात संकेतांक (आयईसी) धारक उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

यावेळी विदेश व्यापार उपमहासंचालक स्नेहल ढोके यांनी निर्यात प्रोत्साहन मोहिमेची माहिती दिली. तसेच ‘निर्यात दिशा’ व ‘निर्यात प्रोत्साहन’ या योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधी, प्रोत्साहनपर उपाययोजना आणि निर्यातवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी उपआयुक्त (उद्योग) अनमोल कोरे यांनी प्रास्ताविकातून चंद्रपूर जिल्ह्याची सद्यस्थितीतील निर्यात क्षमता, जिल्हा उद्योग केंद्राची भूमिका, जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीचे कार्य तसेच महाराष्ट्र निर्यात धोरण 2023 याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार कराराबाबत सादरीकरण करून या कराराच्या अनुषंगाने उद्योजकांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यापार व निर्यातीच्या संधींवर प्रकाश टाकला.

या परिषदेत वॉलमार्ट, डीएचएल, भारतीय लघुउद्योग विकास बँक (सीडबी), भारतीय निर्यात-आयात बँक (एक्झिम बँक), निर्यात पत हमी महामंडळ (ईसीजीसी), अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषद (ईईपीसी), कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) तसेच भारतीय टपाल विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यांनी ई-कॉमर्सच्या माध्यमातून निर्यातवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचे मार्ग, निर्यात प्रक्रियेतील सुलभता, आर्थिक सहाय्य, निर्यात पत संरक्षण आणि विविध संस्थात्मक योजनांबाबत उद्योजकांना मार्गदर्शन केले.

स्थानिक उद्योगांच्या निर्यातीला चालना देण्यावर भर
चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक उद्योग, लघु व मध्यम उद्योजक तसेच नव्याने निर्यात क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेशी जोडणे, निर्यातीसाठी आवश्यक माहिती व संस्थात्मक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्याची निर्यात क्षमता वृद्धिंगत करणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता.

या शिबिरामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यातविषयक शासकीय योजना, ई-कॉमर्सच्या संधी तसेच विविध वित्तीय व निर्यात प्रोत्साहन संस्थांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular