चंद्रपूर :- ग्रामीण, दुर्गम आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील ब्राईट एज फाउंडेशनच्या ‘द मॅजिक बुक क्लब’ला महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘The Magic Book Club’ of Bhisi receives the ‘Reading Inspiration Award’
भाषा संचालनालय व मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबई येथील शासकीय विधि महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाचन प्रेरणा दिन आणि महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि भाषा संचालक अरुण गिते उपस्थित होते. ब्राईट एज संस्थेच्या वतीने मॅजिक बुक क्लबच्या संयोजिका यशोदा कोकीळा शेषराव जांभुळे यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, धनादेश आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सात वर्षांपूर्वी चार वाचकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाशी सध्या ३०० हून अधिक वाचक जोडले गेले आहेत. आतापर्यंत ११० हून अधिक पुस्तकांवर वाचन आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील विविध वाचनालयांना एक लाख रुपयांहून अधिक किमतीची पुस्तके, कपाटे आणि आर्थिक मदत संस्थेतर्फे देण्यात आली आहे. ‘मॅजिक अकॅडमी’च्या माध्यमातून आदिवासी व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, निवास आणि भोजनाची सुविधा पुरविली जाते. या उपक्रमाचा चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, १२५ हून अधिक विद्यार्थी शासकीय सेवा आणि नामांकित विद्यापीठांपर्यंत पोहोचले आहेत. पुरस्कारातून मिळणारा निधी नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे यांनी सांगितले.