Monday, November 4, 2024
HomeAgricultureपूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
spot_img
spot_img

पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Guardian Minister Sudhir Mungantiwar will try to provide more help to the flood victims
Affidavit to raise the issue in the Cabinet regarding increasing government assistance

चंद्रपूर :- 19 जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान्य, भांडी, बक-या, कोंबड्या, बैलजोडी आदी वाहून गेले आहेत. पूरपिडीतांचे नुकसान मोठे आहे. शासन आणि प्रशासनाने शासन निर्णयानुसार अति तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 5 हजार रुपयांची मदत दिली आहे. मात्र ही मदत अतिशय कमी असून पूरग्रस्तांना वाढीव मदत मिळावी, यासाठी शासन निर्णयात बदल करण्याचा मुद्दा मंत्रीमंडळात आपण आवर्जुन मांडू, आणि वाढीव मदतीसाठी पूर्णशक्तीनिशी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी दिली.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा रविवारी वन अकादमी येथे आढावा घेतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, राहूल पावडे, रामपालसिंग, ब्रिजभुषण पाझारे आदी उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात येते, मात्र ही मदत 5 हजारावरून 10 हजार रुपये करण्यात यावी, यासाठी मंत्रीमंडळात हा विषय मांडण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान झाल्यास कोरडवाहू क्षेत्राकरीता 8500 रुपये तर सिंचन असल्यास 17 हजार रुपये प्रति हेक्टर पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येते. त्यामुळे यात बदल करून संपूर्ण लागवड क्षेत्राकरीता नुकसान भरपाई देण्यात यावी. अतिवृष्टी अथवा पुरामुळे जमीन खरवडून गेली तर शासन निर्णयानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाते. ही मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढविण्यात यावी.

पूर परिस्थितीत मत्स्यबीज / मासे वाहून गेल्यास त्याची नुकसान भरपाई मत्स्यसंस्थेस देण्यात यावी. नैसर्गिक आपत्तीत मामा तलावांचा बंधारा व कालवे यांच्या दुरुस्तीकरीता अनुदान देण्यात यावे, हे सर्व विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच शेतात साठविलेली खते, बियाणे पूर्णपणे नष्ट झाल्यास संबंधित शेतक-यांनी त्याचे फोटो काढून ठेवावे आणि कृषी विभागाकडे अर्ज सादर करावा. जेणेकरून याबाबत मदत देय आहे का, ते तपासण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले. बैठकीला तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या.

पंचनामे करतांना संवेदनशील रहा : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे तसेच शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ग्रामस्तरावरील पंचनामे करणारे तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी आदींनी अतिशय संवेदनशीलपणे पंचनामे करावेत. संकटाच्या काळात पूरपिडीत कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा. तसेच पंचनाम्याच्या वेळी गावक-यांनी सुध्दा आवर्जुन उपस्थित राहावे. एकही पूरपिडीत कुटुंब पंचनामापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे आदेशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular