Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeSportमानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार :...

मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातून जागतिक स्तरावर व्याघ्र संरक्षणाचा संदेश

Tiger conservation is necessary for the protection of human life, creation – Forest Minister Sudhir Mungantiwar: Global tiger conservation message from Chandrapur

◆ तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

चंद्रपूर : – ‘वाघ तिथे वन आहे….वन तिथे जल आहे….जल तिथे मानव सृष्टी आहे.’ पर्यावरणाच्या जीवनचक्राचा महत्वाचा घटक असलेला वाघ वाचला तरच जंगल आणि जीवनसृष्टी वाचेल. त्यामुळे मानवी जीवन आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी आपण सर्व जण एकत्र येऊन वाघ वाचविण्याचा संकल्प करूया, असा संदेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

महाराष्ट्र शासन आणि वन विभागाच्यावतीने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

देश-विदेशातील पर्यटकांमध्ये सर्वांत लोकप्रिय असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ताडोबा महोत्सव’ शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. सर्वांना संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेत आम्ही केवळ आमच्या मौल्यवान जैवविविधतेचे रक्षणच करीत नाही तर स्थानिकांसाठी आर्थिक प्रगतीच्या संधीही निर्माण करतो. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय शोकेसमध्ये नेण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सिंगापूरच्या धर्तीवर आता चंद्रपुरात सफारी सुरू करण्यात येईल. यात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाचे प्राणी बघायला मिळतील. विशेष म्हणजे सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. ताडोबा हे जगातील सर्वांत उत्तम व्हावे, असा प्रयत्न आहे. गत काळात वृक्षलागवडीतून राज्यात 2 हजार 550 चौरस किलोमीटर हरित आच्छादन वाढले आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. ताडोबा महोत्सवात तीन दिवस विविध महत्वाच्या विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे, नागरिकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

तत्पूर्वी दीप प्रज्वलन आणि आदिवासी नृत्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी बल्लारपूर येथील जयशिवराय ग्रुपने वाघ नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी ताडोबा प्रकल्पाविषयी तसेच या आयोजनामागची भूमिका विशद केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular