thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj will be delivered to the homes – Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar’s determination.
◆ छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध उपक्रम
● चंद्रपूरमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग
चंद्रपूर :- स्वराज्याच्या रक्षणासाठी अठरापगड जातींना एकत्र आणून दडपशाहीविरूद्ध लढा देत आपल्याला अस्तित्व मिळवून देणाऱ्या शिवबाला सर्व विचारधारेच्या नागरिकांनी हृदयात स्थान द्यावे असे मार्मीक आवाहन करत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे काल (शुक्रवारी) सांगितले.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर चार दिवस या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत झाला.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, हरीश शर्मा, राहुल पावडे, सौ.सपना मुनगंटीवार, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, राखी कंचर्लावार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘छत्रपती शिवरायांचे चरित्र आम्हाला कायम प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशात पोहोचविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. लंडनमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले १२ गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे किल्ले जागतिक यादीत समाविष्ठ होतील असा मला विश्वास आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातील हा ऐतिहासिक वारसा अभिमानाने बघेल याची मला खात्री आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर येथे देखील शिवाजी महाराजांची सर्वात सुंदर प्रतिकृती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सातारा येथे देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वात मोठा पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात येणार असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून रायगड येथे जलाभिषेक करण्यात आला. तसेच आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण-ए-खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणे, अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे, प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला चांदीचे छत्र अर्पण करणे, रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर, “शिवकालीन होन” तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री. शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून भारतात आणण्याचा सामंजस्य करार, जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय सेनेच्या कॅम्पमध्ये बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आदी उपक्रम राबविण्यात आले.
‘जाणता राजा’ प्रयोगाला चंद्रपूरकरांचा उदंड प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘जाणता राजा’ या महानाट्याला जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावून उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांची अलोट गर्दी व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर आसमंतात निनादला. Huge response of thousands of Chandrapurkars to the ‘Janata Raja’ experiment
शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या दिग्दर्शनात ‘जाणता राजा’ नाट्यकृतीची निर्मिती झाली होती. आतापर्यंत देशात व विदेशात शेकडो प्रयोग झाले आहेत. शिवछत्रपतींच्या पूर्वीचा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीत माजलेली अनागोंदी, शिवरायांचा जन्म, तरुण वयात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, प्रशासनावरची जरब, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, आग्र्यावरून झालेली सुटका, शिवरायांचा राज्याभिषेक आदी विविध घटनांना उजाळा देणारे प्रसंग यामध्ये जीवंत करण्यात आले आहे. प्रभावी संवाद, भव्य फिरत्या रंगमंचावर 200 पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रसंगानुरुप उभे करण्यात आलेले देखावे, विविध परंपरा व लोककलांचे सादरीकरण, घोडे, उंट असा लवाजमा, भव्यदिव्य नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत संयोजन व उत्तम संवादफेक प्रेक्षकांना भुरळ पाडणारे होते. तब्बल तीन तास प्रेक्षकांना महानाट्याने खिळवून ठेवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी प्रतिष्ठानचे अजित आपटे, महानाट्याचे दिग्दर्शक योगेश शिरोळे, नृत्य दिग्दर्शक प्रशांत चव्हाण, शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलावंत राहुल गांगल व शैलेश गंधारे, जिजाऊ साकारणाऱ्या साक्षी परकाळे तसेच शाहिर महेश आंबेकर यांचा यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोमवारचा शेवटचा प्रयोग सर्वांसाठी खुला
चंद्रपूर येथे जाणता राजा या महानाट्याचे आयोजन 4 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले होते, मात्र ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला विशेष बाब म्हणून येथे एक दिवस जास्त म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत ‘जाणता राजा’चे प्रयोग वाढविण्याची घोषणा केली. दररोज सायंकाळी सहानंतर या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीचा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्यापासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे सोमवारी प्रयोगाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.