Take adequate care while lighting Holi; Invocation of msedcl
चंद्रपूर :-
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा उत्साह व्दिगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
होळी पेटवितांना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहीत्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून भिषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या हया भुमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भुमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटवितांना शक्यतो मोकळया जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणतांना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकीत अपघातास कारणीभूत ठरू शकते.
त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या, रंग भरलेले फुगे फेकतांना ते वीजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या, विज वितरण यंत्रणेचे रोहीत्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळतांना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने वीजेचा खांबांना स्पर्श करू नका. वीजेच्या खांबा सभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. तसेच विजवाहिन्यावर रंगाने माखलेले ओले कपडे, चिंध्या फेकू नये त्यामुळे विजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सम्भवतात.
होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने महावितरणच्या आवाहना प्रमाणे खबरदारी घेऊन होळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ श्री सुनील देशपांडे यांनी केले आहे.