Monday, March 17, 2025
HomeSportनागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ; ताडोबा...

नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छांनी ताडोबा महोत्सव यशस्वी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ; ताडोबा महोत्सवाचा समारोप

Tadoba Festival successful with citizens’ cooperation and wishes – Forest Minister Sudhir Mungantiwar ;  Tadoba Festival concludes

चंद्रपूर :- महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे प्रगतीच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा नेहमी अग्रेसर असावा, असा आपला प्रयत्न आहे. जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, म्हणून येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हा महोत्सव यशस्वी झाला. ताडोबा महोत्सवामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण जगात गेली, असे मनोगत राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

चांदा क्लब ग्राउंड येथे राज्य शासन व वन विभागाच्या वतीने पहिला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील चैतराम पवार यांना देण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उन्नीयाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उत्तराखंडचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुप मलिक, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीआयडी फेम शिवाजी साटम आदी उपस्थित होते.

वाघाची भूमी असलेल्या चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जगाचे केंद्र व्हावे, या उद्देशाने ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आपला प्रयत्न आहे. गत तीन दिवसांपासून ताडोबा महोत्सव हा सोशल माध्यमांमध्ये सर्वोच्च ट्रेंडवर पोहोचला आहे. तसेच या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेतील स्पर्धकांनी त्यांच्या देशातसुद्धा समाज माध्यमातून ताडोबा महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला, ही चंद्रपूरकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचा वाघ आता जगात पोहोचला आहे, हे आपले यश आहे. वनांचे संरक्षण करणाऱ्यांना आजपासून वनभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणारे चैतराम पवार यांना 20 लक्ष रुपयांचा पहिला वन भूषण पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. या महोत्सवाच्या प्रेमापोटी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे जगप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. रमाकांत पांडा, सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम, विश्वसुंदरी स्पर्धेतील स्पर्धक आदींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी ताडोबा महोत्सवाला केलेले सहकार्य हे अभूतपूर्व आहे. त्यामुळेच हा उत्सव यशस्वी होऊ शकला, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चैतराम पवार यांना पहिला वन भूषण पुरस्कार : आदिवासी कल्याण वनवासी आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या 100 गावांमध्ये वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार ताडोबा महोत्सवात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी त्यांना 20 लक्ष रुपयांचा धनादेश व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना चैतराम पवार म्हणाले, राज्य सरकारने या पुरस्कारासाठी तळागाळातील माणसाला शोधले. या पुरस्कारामुळे काम करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. वनवासी कल्याण आश्रम तसेच वनविभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कामासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. 15-16 गावांचे क्लस्टर करून सामुदायिक वन विकसित करण्याचे आमचे प्रयत्न आहे. जल, जंगल, जमीन, पशुधन या माध्यमातून शाश्वत विकास शक्य असून हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नव्हे तर खानदेशाचा गौरव असल्याचे श्री. पवार म्हणाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांना / संस्थांना पुरस्कार वितरण :
ताडोबा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात विविध संस्था तसेच मान्यवरांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्राम पर्यावरण विकास समिती अंतर्गत चेकबोर्डा, मारूडा, देवाडा, सातारा या गावांना पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट प्राथमिक कृतीदल पुरस्कार वायगाव, मोकासा, करवल, खातेदा, कोंडेगाव, गोंडमोहळी या गावांना, आदर्श वणवा व्यवस्थापन पुरस्कार आडेगाव, डोनी, दुधाळा, वासेरा, रानतळोदी या गावांना, ग्रामपरिस्थितीय पर्यावरणाचा उत्कृष्ट पुरस्कार मामला, आगरझरी, निंबाळा, बोर्डा या गावांना, उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक पुरस्कार विनोद उईके, कृष्णा पाटील, मनोज भलावी, विराज राऊत यांना शाश्वत पर्यटन आणि सेवा देणारे उत्कृष्ट पुरस्कार ससारा जंगल लॉज, ताडोबा होम स्टे कॉटेज, ताडोबा टायगर व्हॅली रिसॉर्ट यांना, वन्यजीव संवर्धनासाठी सामाजिक दायित्व पुरस्कार मिटकॉन कन्सल्टन्सी, आयसीआयसीआय फाउंडेशन, हेमेंद्र कोठारी फाउंडेशन, सनफ्लॅग फाउंडेशन यांना, वन्यजीव अधिवास विकास पुरस्कार डॉ. गजानन मुरदकर, डॉ. पी.डी. कडूकर, ट्री फाउंडेशन, तरुण पर्यावरणवादी मंडळ, आणि इको – प्रो यांना, शीघ्रबचाव दल पुरस्कार डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोल, अभय मराठे, अमोल कोरपे यांना तर उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार गोलू बाराहाते, देवानंद साखरकर आणि कमलेश ठाकूर यांना देण्यात आला.

तसेच यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रीय संचालक वीरेंद्र तिवारी, नितीन काकोडकर, एस.एच. पाटील यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular