Stop drug sale forever – MLA Kishore Jorgewar
*अमली पदार्थ विक्रीची पायमुळे शोधत कायमचा बंदोबस्त करा – आ. किशोर जोरगेवार*
*पोलिस अधीक्षकांना सूचना, मृतक तन्मय खान यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट*
चंद्रपूर :- नशेत असलेल्या चार युवकांनी तन्मय खान यांची हत्या केली. हे सर्व युवक अल्पवयीन आहेत. त्यांच्या हातात अमली पदार्थ कसे पोहोचले, असा प्रश्न उपस्थित करत, अमली पदार्थ विक्रीची पायमुळे शोधून काढत विक्रेत्यांचा कायमचा बंदोबस्त करा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना दिल्या आहेत. Stop drug sale forever
चार युवकांनी मिळून बाबूपेठ येथील रहिवासी तन्मय खान यांची हत्या केल्याची घटना गौतम नगर परिसरात घडली होती. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोपी नशेत असल्याचे उघड झाल्याने गांजा, ड्रग्जसारख्या अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी तन्मय खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, शांतप्रिय चंद्रपूर जिल्ह्यासाठी अशा घटना अत्यंत घातक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी शहर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बाबूपेठ परिसरात पोलिस गस्त वाढवण्याचे निर्देश दिले.तसेच, अमली पदार्थ विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून अमली पदार्थ विक्रीबाबत चिंता व्यक्त केली. शाळा पातळीवर जनजागृती मोहिम राबवावी, तसेच अमली पदार्थ विक्री करणार्यांवर कारवाईसाठी विशेष पथक तयार करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
स्थानिक नागरिकांना अशा पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती असते, तर पोलिसांना ती कशी मिळत नाही, असा सवाल उपस्थित करत, पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा गुन्हेगारी व्यवसायात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करून कायदा-सुव्यवस्था राखावी, असेही यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक याना सांगितले आहे.
जनजागृती मोहिम राबवा..
शाळकरी अल्पवयीन युवक अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी जात आहेत, ही चिंताजनक बाब आहे. असे युवक आढळल्यास त्यांच्या पालकांना माहिती द्या. शाळा-महाविद्यालय पातळीवर जनजागृती मोहिम राबवून नशामुक्त समाज निर्मितीकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत.