We cannot become a good writer but we can become a good reader – Achal Vararkar Sharadrao Pawar College of Arts and Commerce celebrated Marathi language honor day
चंद्रपूर :- इंग्रजी कॉन्व्हेंट आणि इंग्रजी भाषेच्या अतिवापरामुळे महाराष्ट्रात आपल्या मातृभाषेची गळचेपी होत आहे, तेव्हा मराठी भाषा टिकवायची असेल, तिचे जतन, संवर्धन करायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तम लेखक कवी होऊ शकलो नाही तरी चालेल पण आपण उत्तम वाचक झालो आणि आपले सर्व व्यवहार मराठी भाषेतून केले तर आपण आपल्या मातृभाषा मराठीला उंच शिखरावर नेऊ शकतो असे आवाहन कु. आचल वरारकर यांनी केले
शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह सर यांच्या मार्गदर्शनात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने “मराठी भाषा गौरव दिन ” या कार्यक्रमात कु. आचल वरारकर बोलत होत्या.
“मराठी भाषेपुढील आव्हाने व उपाय ” या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले या चर्चासत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट दीपक चटप आणि कवी अविनाश पोईनकर उपस्थित होते.
आपण कोणत्याही क्षेत्रात जा, किंवा कोणत्याही देशात जा पण आपल्या मराठी भाषेला विसरू नका असे आवाहन लंडन येथे आलेल्या अनुभवाच्याद्वारे दीपक चटप यांनी केले तर अविनाश पोईनकर यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी मोबाईल सोडून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करावे ज्यातून तुमचे ज्ञान तर वाढेलच सोबतच आपली मराठी भाषा अधिक समृद्ध होत जाईल असे सांगितले.
” मराठी भाषा गौरव दिनाच्या ” निमित्ताने आयोजित केलेल्या “मराठी भाषेपुढील आव्हाने व उपाय ” या विषयावर कु. दुर्गा चटारे, कु. दीक्षा वाघमारे, अविनाश राऊत, कु, साक्षी मालेकर, कु ,तृप्ती निखाडे, शुभम कंटाळे या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मराठी विभाग प्रमुख डॉ. हेमचंद दूधगवळी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी विद्यार्थ्यांना आपले सर्व भाषिक व्यवहार मराठी भाषेतून करावे तसेच शासनाने सुद्धा मराठी भाषा संवर्धन समिती तयार करून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जसे मोठे अनुदान दिले जाते तसे या समितीलाही द्यावे असे म्हटले आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे, डॉ. सुनील बिडवाईक, डॉ. सत्येंद्र सिंह सर प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा .कुमारी उज्वला जानवे यांनी केले तर आभार शुभम कंठाळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.