Protection of the environment due to habitat Vulture in Tadobat; Inauguration of Vulture (Jatayu) Conservation Project by Forest Minister Sudhir Mungantiwar
◆ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण
चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प Tadoba Tiger Project वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भुमीत आता जटायु पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्वाची बाब आहे. विशेष म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायु पक्षाच्या ताडोबातील अधिवासामुळे निसर्गाची श्रृंखला पुर्नस्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते कोळसा वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई Maharashtra State Forest Department & Bombay Natural History Society Mumbai यांच्या संयुक्त विद्यमाने बोटेझरी जटायु संवर्धन राज्यस्तरीय प्रकल्पाचे उद्घाटन करतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार Forest Minister Sudhir Mungantiwar बोलत होते. यावेळी येथे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, उपसंचालक नंदकिशोर काळे, सरपंच माधुरी वेलादे आदी उपस्थित होते.
रामायणामध्ये जटायु पक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ताडोबा येथे राज्यातील जटायु संवर्धनाचा महत्वाचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पांढरी पाठ असणारे 10 जटायु पक्षी देण्यात आले असून यापुढेही ताडोबात टप्प्याटप्प्याने जटायु येणार आहेत.
पुढे ते म्हणाले, प्राणवायु देणारे वन अतिशय महत्वाचे आहे. आज अर्थशास्त्रापेक्षा पर्यावरणशास्त्र आणि वनशास्त्राला महत्व आले आहे. चंद्रपूरच्या जनतेने वनांवर मनापासून प्रेम केले आहे. आयुष्याचा पहिला श्वास वनांसोबत आणि शेवटचा प्रवासही लाकडासोबतच होतो. त्यामुळे पर्यावरण राहिले तरच मनुष्यसृष्टी राहील आणि जटायु हा पर्यावरणाचा स्वच्छता दूत आहे, त्यामुळेच जटायु संवर्धनाचा संकल्प केला आहे. आज 10 जटायु आहे, आता त्याची संख्या 20 आणि पुढे 40 करण्यासाठी ज्यांच्या नावातच ‘राम’ आहे, अशा डॉ. रामगावकर यांच्यावर जटायू संवर्धनाची जास्त जबाबदारी आहे, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता वनभूषण पुरस्कार : वनांसोबत आयुष्याचे एक नाते असते. वनांपासून वनांसाठी मनापासून काम करणा-यांना आता महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. ताडोबा उत्सवामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच जटायु संवर्धन प्रकल्प : डॉ. प्रवीण परदेशी
चंद्रपूरकरीता आजचा दिवस अतिशय महत्वाचा असून अयोध्या येथे प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये जटायुचे आगमन झाले आहे. जटायु पक्षामुळे निसर्गाची स्वच्छता होते. ताडोबा क्षेत्रातील गावे पुनर्वसित झाल्यामुळे येथे मनुष्यविरहीत जंगल आहे. त्यामुळे ताडोबा हे जटायुंचे चांगले अधिवास होईल. जटायु संवर्धन प्रकल्पासाठी राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेतला. निसर्गाची श्रृंखला यामुळे पुर्नस्थापित होणार असल्यामुळे लुप्त झालेल्या जटायुचा पुनर्जन्म झाला असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी यांनी सांगितले.
प्रास्ताविकात क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, जटायुचे निसर्गामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. ताडोबा जटायुसाठी सुरक्षित वनक्षेत्र आहे. प्रथम टप्प्यात 10 जटायु संशोधकांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना निसर्गात सोडले जाईल. ताडोबातील जटायु संवर्धन अतिशय मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला तन्मय बिडवई, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे प्रकाश धारणे, डॉ. मंगेश गुलवाडे, अरुण तिखे, ब्रिजभुषण पाझारे, विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
जटायु (गिधाड) हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. गावाच्या वेशीवर टाकल्या जाणा-या मृत प्राण्यांना खाऊन गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवत असे. भारतात जटायुच्या 9 प्रजाती आढळतात. सन 1990 मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती पण, आता ती संख्या कमी होऊन केवळ 50 हजारांवर आली आहे. जटायु प्रजाती नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन कारणीभूत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायु या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन जटायुंच्या शरीरात जाते आणि परिणामी जटायु मरण पावतात. जटायुची संख्या कमी होणे जैवविविधता व निसर्ग चक्राला घातक आहे.
अशा संकटग्रस्त जटायु पक्ष्याला या क्षेत्रात पुन-प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या महत्वपूर्ण पुढाकाराने जटायु संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या पिंजोर (हरियाणा) येथील गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे 10 गिधाड पक्षी रीतसर शासनाची परवानगी घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रिरीलीज अव्हीयारी मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले आहे. साधारणत: 3 महिन्यानंतर त्यांना निसर्ग मुक्त करण्यात येणार आहेत.