Project-affected girls on indefinite hunger strike for 8 days ; Government should take note of Pallavi Korde’s movement – Pappu Deshmukh
चंद्रपूर :- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील वीस दिवसांपासून बरांज-मोकासा गावातील सावित्रीच्या प्रकल्पग्रस्त लेकींचे आंदोलन सुरू आहे. कर्नाटका पाॅवर कंपनीच्या कोळसा खाणीच्या मार्गावर मंडप टाकून महिलांनी 14 डिसेंबर 2023 पासून साखळी उपोषण सुरू केले.27 डिसेंबर पासून बरांज-मोकासा येथील पल्लवी कोरडे या महिलेने आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचेसह घनश्याम येरगुडे,राहुल दडमल, अमोल घोडमारे व प्रविण बारसागडे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या तसेच आंदोलनात सहभागी सावित्रीच्या लेकींशी चर्चा केली.यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो महिला आंदोलनकर्त्यांना देशमुख यांनी संबोधित केले. कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमीन किंवा घर देणारा शेतकरी-घर मालक हा त्या प्रकल्पाचा भागधारक म्हणून त्याला योग्य सन्मान व योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहित करणाऱ्या कंपन्या किंवा शासन प्रकल्पग्रस्तांना योग्य सन्मान व योग्य मोबदला देत नाही.अशा प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करण्याची जनविकास सेनेची भूमिका असून बरांज-मोकासा येथील आंदोलनकर्त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले.
अत्यंत धोकादायक :- कोळसा खाणीच्या काठावरच गाव आणि जिल्हा परिषद शाळा
पप्पू देशमुख यांनी काही आंदोलनकर्त्यांसह बरांज-मोकासा गाव,कर्नाटक पावर कंपनीची कोळसा खाण तसेच जिल्हा परिषद शाळा या संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. गावाच्या पश्चिमेला कर्नाटक एमटा च्या जुन्या कोळसा खाणीचा मोठा खड्डा आहे. याठिकाणी कोळशाचे उत्खनन पूर्ण झाले असून खड्ड्यात पाणी साचले आहे. खड्ड्याला लागून केवळ 20 मीटरच्या अंतरावर जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा आहे. खड्ड्याच्या बाजूला शाळेची संरक्षण भिंत असून या भिंतीला असलेले प्रवेशद्वार पूर्णवेळ खुले असते. याच पटांगणात ग्रामपंचायतचे कार्यालय आहे.शाळेच्या बाजूला लागून असलेला खड्डा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असतानाही त्याची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. बरांज-मोकासा गाव, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय सर्वच अत्यंत धोकादायक स्थितीत असुन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.