Progress is possible if you work conscientiously, with national interest in mind – Sudhir Mungantiwar. Distribution of Priyadarshini Indira Gandhi Smriti Special Service Award
चंद्रपूर :- कोणताही जिल्हा किंवा देश घडवायचा असेल, समाजाची प्रगती साधायची असेल तर सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे नितांत गरजेचे आहे. कर्तव्यनिष्ठेने, देशहिताच्या विचारांनी कार्य केल्यास जिल्हाच काय देशाचीही प्रगती संभव आहे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रियदर्शनी चौकात आयोजित प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

माजी खासदार तथा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश पुगलीया, राहुल पुगलीया शांतीधाम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, डॉ. दुधलवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘जब तक सूरज चांद रहेगा, हमारा तिरंगा लहराता रहेगा’ या भावनेने, कर्तव्यनिष्ठेने, देशहिताच्या विचाराने काम करण्याचा संकल्प केला जातो. या संकल्पाची पूर्तता करायची असेल तर सेवाभावी वृत्ती गरजेची आहे. असा सेवाभाव असणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे. शुद्ध हेतू ठेवून श्री. नरेश पुगलीया व त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आणि संवेदनशीलपणे कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे.
कोणतीही बाब स्थायी नाही. प्रत्येकच व्यक्ती एखाद्या विशिष्ट काळासाठी एखाद्या पदावर कार्यरत असतो. एखादा व्यक्ती पदावर असताना त्याने केलेल्या कार्याच्या आठवणी राहुन जातात. याच कारणामुळे जिल्ह्याच्या, देशाच्या विकासाकरीता जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आपला माझा नेहमी संकल्प राहिला आहे, जे कार्य करणार ते महाराष्ट्रातच नाही तर भारतात उत्तम व्हावे. अर्थमंत्री असताना गोरक्षणावर योजना तयार केली. नुकतीच ‘टायगर प्रोजेक्ट’ची बैठक पार पडली. तेव्हा आग्रहपूर्वक गोरक्षणाचा मुद्दा मांडला. सक्षम गो पालनासाठी सर्वत्र कुरण विकसित केले पाहिजे. चंद्रपुराच्या प्रगतीत शांतीधाम हा सुद्धा महत्त्वाचा प्रकल्प आहे. गेल्या 17 ते 18 वर्षाआधी या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता देखील नव्हता. काही संस्थांच्या पुढाकाराने तेथे बऱ्यापैकी काम झाले. शांतीधामचे उत्तम ‘डिझाईन’ तयार करावे, अशी सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. लहान विकासकामे देशील देशाच्या प्रगतीसाठी मोलाची आहे, ती कामे उत्तम नियोजन करून केलेली असावी, त्याचा लाभ सामान्य जनतेला व्हावा. अशी विकासकामे चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
विकासाच्या दिशेने घोडदौड
जिल्हात मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल उभे राहत असून वेगाने पूर्णत्वास येत आहे. ईएसआयसीचे 100 बेडेड हॉस्पिटल चंद्रपूर-बल्लारपूरच्या मध्ये उभे राहत आहे. केंद्राचे पर्यावरण सचिव यांनी नुकतीच वन अकादमीला भेट दिली. वन अकादमीला तीन स्टार मानांकन प्राप्त झाले. वन अकादमीचे हे मानांकन देशात नंबर एकचे आहे. जिल्ह्यातील मुलींसाठी 62 कौशल्य आधारित प्रशिक्षण देणारे एसएनडीटी विद्यापीठाचे भव्य उपकेंद्र उभे राहत आहे. यामध्ये जिल्ह्यातील महिला उत्तम कौशल्य शिक्षण घेऊन आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये योगदान देऊ शकेल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बारामती पेक्षाही चंद्रपूर हा वेगाने पुढे जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
सेवा पुरस्काराचे वितरण
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान, चंद्रपूरच्या वतीने देश विकासासाठी व समाज उत्थानासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार शांतीधाम सामाजिक संस्थेला प्रदान करण्यात आला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार यांना रोख रक्कम रु. 1 लक्ष 11 हजार 111 रुपये व सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.