Pay immediate compensation of crops and animals to the farmers affected by heavy rains: MLA Subhash Dhote’s demand to the District Collector
चंद्रपूर :- जिल्ह्यातील राजुरा मतदार संघात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतपिके आणि जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे, उन्हाची काहिली सुरू असताना मंगळवारी दि. १९ मार्च २०२४ रोजी राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील शिवारात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गहू, मिरची, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांचे व पाले भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागात अनेक घरांचे छप्पर उडाले. तसेच अनेकांची जनावरे मृत्यू पावली आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागातील शेतातील उभी पिके जमिनीत गाळल्या गेली.
सुरुवातीलाच नापिकी झाल्याने व पिकांना कवडी मोल भाव मिळाल्याने शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला असतांना आताच्या अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थीक अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवुन तातडीने नुकसान भरपाई मिळणेसंदर्भाने शेतकरी बांधवांकडुन मागणी केली जात आहे.
तेव्हा सदर गंभीर बाब लक्षात घेऊन राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यामधील अतिवृष्टी व गरपीटामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे संदर्भाने तातडीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.