MLA Sudhakar Adbale became ‘Nath’ of orphans b “On the spot” approval of 2 appointments at the initiative of MLA Sudhakar Adbale in a problem solving meeting
चंद्रपूर :- शाळेत कार्यरत असताना वडिलांचे छत हरपले. आईही नाही. ‘दीक्षा आणि कैलास’ ची ही व्यथा. परिस्थिती हलाखीची. दोघांचाही वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी आटापिटा सुरू होतो. नियुक्तीच्या प्रस्तावावर शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या मदतीला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale धावून येतात. अन् अधिकाऱ्यांना धारेवर धरताच २ अनुकंपा नियुक्तीस “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात येते. पत्र मिळाल्यानंतर पाल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरच काही सांगून जातो. याबद्दल ते आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानतात. हा सारा घटनाक्रम आहे अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. सिंधुताई सपकाळ सभागृहातील.
‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक २५ जून २०२४ रोजी वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), पे युनिट अधीक्षक (प्राथ./माध्य.), सर्व गटशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी यांच्यासोबत समस्या निवारण सभा स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह, जिल्हा परिषद येथे घेतली. ही सभा दुपारी १२ ते रात्री ७.३० पर्यंत तब्बल साडेसात तास चालली.
वर्धा जिल्ह्यातील अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारांचे पालक शाळेमध्ये नोकरीला असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर दोघेही शाळेत रुजू झाले. मात्र, पदास मान्यता मिळाली नसल्याने पगार मिळत नव्हता. कैलास हा सकाळी शाळेत काम करून दुपारी रोजंदारीवर जात होता. दीक्षाचीही परिस्थिती तीच. याबाबत दोन्ही शाळेने शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयात पाठविलेल्या नियुक्तीच्या प्रस्तावावर गेल्या अनेक महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही होत नव्हती. त्रुटी काढून परत केले जात होते. सदर प्रकार विमाशी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पार पडलेल्या सभेत आमदार सुधाकर अडबाले लक्षात आणून दिला. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आजच्या आज मान्यता द्या, त्याशिवाय मी इथून जाणार नाही, अशी शिक्षणाधिकारी यांना तंबी देताच यंत्रणा कामाला लागली आणि दीक्षा दखणे व कैलास कोडापे यांना मान्यतेचे पत्र “ऑन द स्पॉट” सभेतच देण्यात आले. पत्र मिळताच पाल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. दिक्षास न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा येथे कनिष्ठ लिपिक सेवक तर कैलास यास यशवंत हायस्कूल अंदोरी येथे शिपाई सेवक नियुक्ती मान्यता देण्यात आली. दोघांनाही पगार सुरू होण्यासाठी शालार्थ आयडी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असे, आमदार अडबाले यांनी सांगितले. या पाल्याला न्याय मिळवून देण्यासाठी विमाशि संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आमदार सुधाकर अडबाले यांनी यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुकंपा प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.
वरिष्ठ / निवड श्रेणी प्रकरणे, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते, वैद्यकीय देयके, जीपीएफ व एनपीएस पावत्या, पदोन्नती प्रकरणे, पेंशन प्रकरणे, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शाळांतील ११ शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १४ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना पेंशन मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ उन्नयन करणे, अनुकंपा प्रकरणे व इतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील १०० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात सेवा हमी कायद्याचे उल्लंघन होत असल्यास संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, शिक्षणाधिकारी (माध्य.) मनीषा भडंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. नितु गावंडे, धर्मपाल कुमरे, समाज कल्याण अधिकारी कुळकर्णी, पे युनिट अधीक्षक ज्ञानेश्वर जवादे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, शशिकांत वैद्य, शशांक हुलके, संदीप चवरे, प्रमोद खोडे, सुरेशकुमार बरे, नंदकिशोर ठाकरे, सुनील दुंपलवार, मंदा चौधरी, मयुरी सालंकार, सुहास गवते, प्रवीण भोयर, चंद्रकांत ठाकरे, गलांडे, दिनेश वाघ, सुनील धवणे, संजय घोडमारे, नरेंद्र ढवळे व विमाशी संघाचे सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.