Nitin Gadkari Rajura what said in public meeting; Vision of Development
चंद्रपूर :- सुधीर मुनगंटीवर हे अत्यंत कर्तृत्ववान, जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणारे नेते आहेत. सैनिकी स्कूल, बॉटनिकल गार्डन, वनअकादमी,रस्ते व पुलांचे बांधकाम तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदी क्षेत्रांत काम करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे. आता अॅडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळवून देण्याचे स्वप्न देखील त्यांनी बाळगले आहे. सुधीरभाऊंकडे चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आहे म्हणूनच हे शक्य होत आहे, असे गौरवगाण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. त्याचवेळी मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन देखील उपस्थित जनसमुदायाला केले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी राजुरा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला ते संबोधित करत होते. यावेळी प्रचार सभेला मंचावर विविध मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसानिमित्त गत आठवणींना उजाळा देताना नितीन गडकरी यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘देशाला विश्वगुरू व जगाची ताकद करण्याच्या’ स्वप्नाला उजाळा दिला. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करीत असल्याचे गडकरी म्हणाले.
मोदी, गडकरी आणि मुनगंटीवार असे ‘ट्रिपल इंजिन’ साधेल चंद्रपूरचा विकास, चंद्रपुरात खनिज संपत्ती, वन संपत्ती, सिमेंट फॅक्टरी असून देशातील उत्तम दर्जाचे लोखंड उपलब्ध आहे. त्याचे उद्योग चंद्रपूर गडचिरोलीत उभारायचे असून पुढील पाच वर्षात 2 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवूणूक येथे येणार आहे. बांबूपासून इथेनॉल, कोळशापासून मिथेनॉल तयार करण्याचे उद्योग ग्रामीण भागात सुरू करायचे असून त्यामाध्यमातून युवकांना रोजगार द्यायचा आहेत. चंद्रपुर जिल्ह्यात सर्वाधिक 474 किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून राजुरा भागाला अडीच हजार कोटी रुपयांची कामे दिली आहेत. या जिल्ह्याचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांचे ‘ट्रिपल इंजिन’च साधू शकेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सभेत बोलतांना गडकरी यांची जिभ सरकली आणि आम्ही मुनगंटीवार यांना ‘शिलाजीत’ देऊ असेही बोलले त्यानंतर त्यांनी भाषा सांभाळत विकासासाठी शिलाजीत देऊ असे म्हटले.
नितिन गडकरी यांच्या सभेला अति उष्ण तापमानामुळे स्थानिक नागरीक व मतदार मोठया प्रमाणात उपस्थित नव्हते परंतु भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.