Muslim community introduction meeting on 2nd and 3rd March on behalf of Minority Development Forum
चंद्रपूर :- मुस्लीम समाजाच्या विकासाकरिता कार्य करणाऱ्या अल्पसंख्याक विकास मंचाच्या वतीने मुस्लीम समाजासाठी विदर्भस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन 2 व 3 मार्च रोजी दादमहल वॉर्डातील कोहिनूर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.
अल्पसंख्याक मंचाचा हा पहिलाच प्रयत्न असून, विवाह इच्छूक उपवर, उपवधूंसह, विधवा, घटस्फोटीत महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन मंचाचे अध्यक्ष मतीन शेख यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
अल्पसंख्याक विकास मंच मागील 15 वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीकरिता काम करीत आहे. मुस्लीम समाजात अनेक गरीब कुटुंब आहे. त्यांच्यासाठी उपवर किंवा उपवधूंचा शोध घेणे मोठे जिकरीचे काम असते. शिवाय घटस्फोटीत, विधवा, विधूर यांच्यासाठी जोडीदार शोधणे कठीण काम असते. त्यामुळे उपवर, उपवधू आणि अन्य विवाह इच्छुकांसाठी जोडीदारांचा शोध घेणे शक्य व्हावे, सोयीस्कर व्हावे, यासाठी होणारा खर्च टाळता यावा यासाठी एकाच मंचावर परिचय मेळावा आयोजित करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास मंचाने घेतला आहे.
याच मेळाव्यात समाजातील उल्लेखनीय व्यक्ती, विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंचाचे अध्यक्ष मतीन शेख, सलीम बेग, सय्यद अतिकभाई, मुस्ताक खान, अश्पाकभाई, रमजान खान, मुजावर अली, राजू निसार, अफरोज पठाण आदी उपस्थित होते.