Message of “Road Safety-Jivan Raksha” from Road Safety Campaign Awareness Rally The rally started by showing the green flag in the hands of the Collector
चंद्रपूर :- राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत 35 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावर प्रवास करता यावा यासाठी आज (दि.7 फेब्रुवारी) रोजी नियोजन भवन येथून शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून ‘रस्ते सुरक्षा-जीवन रक्षा’ हा संदेश देण्यात आला.

सदर जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलीस निरीक्षक रोशन यादव, प्रवीणकुमार पाटील, प्रादेशिक परिवहन विभागाचे इतर मोटर परिवहन अधिकारी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅलीमध्ये पोलीस वाहनांवर हेल्मेटची प्रतिकृती व यमराज बसवून हेल्मेटचे जीवनातील महत्व पटवून देत रस्ता सुरक्षेचे महत्त्व स्लोगन व चित्ररथाद्वारे समजावून सांगितले.
सदर रॅलीमध्ये भवानजीभाई चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रफी अहमद किदवाई हायस्कूल, चांदा पब्लिक स्कूल आणि विद्यानिकेतन हायस्कूल, चंद्रपूर येथील 300 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. सदर रॅली नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय-प्रियदर्शनी चौक- प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयापर्यंत काढण्यात आली.