Mental harassment of sweepers by contractors; Refusal to pay minimum wage: Complaint to Collector
चंद्रपूर :- जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी नगरपंचायतीत कार्यरत सफाई कामगारांचा कंत्राटदारांकडून मानसिक छळ केला जात असून, वारंवार कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे. मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. कंत्राटदाराच्या त्रासामुळे कामगार तणावाखाली काम करीत असून, न्याय मिळवून देण्याची मागणी राधा मेश्राम, मंदा शेंडे, भूमिका गोकुल शेंडे, अक्षय नागपुरे, सरिता मेश्राम यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
भिसी नगरपंचयातीने शहरातील सफाईचे कंत्राट समाज संस्कृती बहुउद्देशीय संस्थेला दिले आहे. या संस्थेअंतर्गत अनेक सफाई कामगार काम करीत आहेत. मात्र, कंत्राटदाराकडून कामगारांना नाहक त्रास दिला जात आहे. काही कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले.
कामगारांना किमान वेतन देणे बंधनकारक असताना केवळ 5 हजार रुपये देऊन दबावाखाली काम करवून घेतल्या जात आहे, किमान वेतन मागितल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. अधिक तास काम करवून घेतले जात असल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला आहे.
संबंधित कंत्राटदार कंपनीला वर्षाकाठी 47 लाख रुपये दिले जात आहे. कामगारांना 370 रुपये रोजी देण्याचे कबूल करण्यात आले. मात्र, केवळ 200 रुपयेच रोजी दिली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
विशेष म्हणजे, कामगारांकडून बँक खात्यात वेतन जमा करण्याच्या नावाखाली पॅन कार्ड, बँक पासबूक, आधार कार्ड मागितले आहे. मात्र, वेतनाची रक्कम बँकेत जमा न करता हातीच दिली जात असून, पीएफसुद्धा दिला जात नाही, असा आरोपही कामगारांनी केला आहे.
कामगारांना दीपक अडकिने यांच्या अर्थक्रांती निधी लिमिटेडमध्ये बँक खाते काढण्यास सांगण्यात आले. परंतु, १८ महिने लोटूनही बँक खात्यात वेतन जमा करण्यात आलेली नाही. तर मागील काही दिवसांपासून पीएफ काढून परत करण्यासाठी कामगारांवर दबाव टाकला जात असल्याने कामगार मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
या प्रकाराकडे मुख्याधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, मुख्याधिकारी, प्रशासक, समाज संस्कृती बहुउद्देशीय संस्थेचे संचालक आणि कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपस्थित कामगारांनी यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या परिषदेत केली.