Mental harassment of drivers and workers: Allegation of Vidarbha Heavy and Motor Drivers Union
चंद्रपूर : माजरी क्षेत्रअंतर्गत एकोना कोलामाईन्स येथे अरुणोदय कोल एजन्सीत काम करणाऱ्या चालक, कामगारांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप विदर्भ लेबर फ्रंट संलग्नित विदर्भ हेवी ॲण्ड मोटर ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
अरुणोदय कोल एजन्सीत ७० ते ८० कामगार काम करीत आहेत. यात काही ट्रकचालक आहेत. मात्र, चालकांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. कामगारांना एचपीसी वेतन लागू केले जात नाही. साप्ताहिक रजा दिली जात नाही. बोनस, एरियर्स दिला जात नाही. तीस दिवस काम केल्यानंतर १५ दिवसाचे वेतन दिले जाते. वेतन पावती दिली जात नाही. याबाबत जाब विचारल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात असल्याने येथील कामगार तणावाखाली काम करीत आहे.
काही कामगारांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्यानंतर परप्रांतीय चालकांना कामावर लावण्यात आले. त्यांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जातात. मात्र, स्थानिकांना या सोयीसुविधांपासून डावलले जात असल्याचा आरोप पोतनवार यांनी केला आहे.
यासंदर्भात विदर्भ हेवी ॲण्ड मोटर ड्रायव्हर युनियनतर्फे १७ जानेवारी रोजी केंद्रीय श्रम उपायुक्त चंद्रपूर यांना चालक व कामगारांवर होणाऱ्याय अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी तक्रार नोंदविण्यात आली आहे. आयुक्तांनी सुनावणीसाठी १९ फेब्रुवारीची तारीख दिली असून, या सुनावणीत तोडगा न निघाल्यास कंपनीत तीव्र आंदोलन करू असा इशारा पोतनवार यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला राजू काळे, कवडू बलकी, मनोज खोडे, अनिकेत उताणे, नितीन चौरंगपते, शुभम बोथले, क्रिष्णा मोहीतकर, संतोष मत्ते, राजफूल रामटेके उपस्थित होते.