Mass marriage gathering of Muslim community in Chandrapur; 21 couples will get married
चंद्रपूर :- खवातीन-ए-इस्लाम संस्थेच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात २१ जोडपे विवाहबद्ध होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष शाहीन शेख व अन्य पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खवातीन-ए-इस्लाम हे मुस्लीम महिलांचे संघटन आहे. या संस्थेच्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत २४० जोडप्यांचा विवाह या संस्थेच्या सामूहिक विवाह मेळाव्यात लावून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे जोडप्यांचे विवाह लावून देण्यासोबतच त्यांना संसारोपयोगी साहित्य भेटस्वरुपात देण्यात येतात. त्यामुळे या विवाह मेळाव्याला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यातून जोडपे या संस्थेच्या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होत आहेत. १८ फेब्रुवारी रोजी कोहीनूर मैदान येथे हा विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, वणी, हिंगणघाट, घुग्घूस, बल्लारपूर, राजुरा आणि मुंबई येथील जोडपे विवाहबद्ध होणार असल्याचे शाहीन शेख यांनी सांगितले.
या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित वर, वधूच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था संस्थेकडून केली जात आहे. ३० ते ४० हजार वऱ्हाडी या विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती शेख यांनी दिली. याप्रसंगी पत्रकार परिषदेला नफिसा अंजूम, रफिया शेख, गुलनाज शेख आदी उपस्थित होते.