KGN Public School Athletes Gold Medal in National Arena Tournament चंद्रपूर : राज्यसरकारने शिवकालीन अस्त्र, शस्त्र युद्ध कलेला स्पर्धेचा दर्जा दिला असून, या कलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शाळा स्तरावर या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या जात असून, अलीकडेच सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय आखाडा स्पर्धेत केजीएन पब्लिक स्कूलच्या बल्लारपूर आणि चंद्रपूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णमय कामगिरी करीत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. खेळाडूंनी तीन सुवर्ण आणि पाच कांस्य पदक पटकावल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सातारा येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच अन्य राज्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत ओम गोगलीया, मंथन श्रृंगारपवार आणि मोहम्मद साद सिद्दिकी यांनी सुवर्ण पदक पटकावले. तर मुरसलीन मन्सुरी, वंश झिलकलवार, सर्वेश नन्नेवार, तन्मय शील, आले मुस्तफा या खेळाडूंनी कांस्य पदक पटकावल्याची माहिती देत खेळाडूंची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.


मागील काही वर्षांत संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळेच्या खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी केली असून, यापुढेही विद्यार्थ्यांना खेळासह विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गुलाम फरीद यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष मेहमूद आसिफ, बल्लारपूर शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाघमारे, चंद्रपूर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता करमनकर, क्रीडा शिक्षक रमेश नातरगी, शेख मेहमुद यांच्यासह पदक विजेते खेळाडू उपस्थित होते.