Green Flag by Guardian Minister Sudhir Mungantiwar at the ceremony of Agriculture Festival; Grand event from 3rd to 7th January 2024
चंद्रपूर :- कृषी विषयक तंत्रज्ञान व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचाव्यात, शेतक-यांचे सक्षमीकरण व्हावे, तसेच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी विकसीत करून शेतक-यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 3 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड येथे कृषी महोत्सवाचे (चांदा ॲग्रो) भव्यदिव्य आयोजन होणार आहे. या महोत्सवाची माहिती जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना होण्यासाठी आत्माच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पाच चित्ररथांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नियोजन भवन येथे आढावा घेतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कृषी महोत्सवात शेतक-यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी प्रदर्शन, प्रात्यक्षिक व प्रशिक्षणाची सोय करावी. महोत्सवाचे बारकाईने नियोजन करून पाच दिवसात होणा-या विविध शेतीपयोगी उपक्रमांची माहिती, प्रात्यक्षिक तसेच प्रशिक्षणाची माहिती शेतक-यांना 1 ते 2 दिवसांपूर्वीच मिळेल, याबाबत नियोजन करावे, तसेच जिल्ह्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.