Get ready to set a world record of Shri Ram Bhakti; Mr. Sudhir Mungantiwar’s appeal to Chandrapurkar
◆ २० जानेवारीला श्रीराम नामस्मरणाच्या ‘गिनेस’ रेकॉर्डसाठी जय्यत तयारी
● अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तीन दिवस भक्तीचा महोत्सव
चंद्रपूर :– प्रभू श्रीरामाच्या नाम स्मरणाचा जागतिक विक्रम प्रस्थापित करून रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनोखी भक्ती समर्पित करण्यासाठी चंद्रपूरकरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी केले. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये Guinness Book of World Records एक अनोखी नोंद करून चंद्रपूरचे नाव जागतिक विक्रमामध्ये कायमस्वरुपी प्रस्थापित होईल, असा विश्वासही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दीप महोत्सव महायज्ञ अभ्यासवर्ग चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, संतश्री मनीषजी महाराज, गिरीश चांडक, मनोज सिंघवी, गोपाल मुंधडा, डॉ.शैलेद्र शुक्ला, शैलेश बागला, चंद्रशेखर अल्लेवार, सुभाष कासनगोट्टुवार, मधुसुदन रुंगठा, हर्षवर्धन सिंघवी, चकोरसिंग बसरा, योगेश भंडारी, मिनाताई देशकर, रामकिशोर सारडा, अमल पोतदार, रामजिवन परमार, विनोद तिवारी, दिलीप भंडारी, स्मिता रेभनकर, बंडू धोत्रे, हेमंत सिंघवी, वासूदेव राठोड, कुशल नागोसे, अंत्याजी ढवस, आदी मान्यवर उपस्थित होते.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस भक्तीचा महोत्सव रंगणार आहे. त्यानिमित्ताने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘चंद्रपूरमधून अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहापासून सर्व लाकडी कामांसाठी काष्ठ पाठविण्यात आले. त्यासाठी देवानेच आपली निवड केली आहे. कारण देहराडूनमध्ये जगभरातील लाकडांचे संशोधन झाले तेव्हा आपलेच काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले. अयोध्येतील मंदिर ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी लेखी पत्राद्वारे तशी पावती दिली. अशा परिस्थितीत अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याची माझी इच्छा होती, पण मी एकटाच जाऊ शकलो असतो आणि चंद्रपूर जिल्हयातील प्रभु श्रीराम भक्त इथेच राहिले असते. त्यामुळे अयोध्येला जाण्यापूर्वी शेकडो रामभक्तांसोबत चंद्रपूरमध्ये ‘सियावर रामचंद्र की जय’ हा रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.’
२० जानेवारीला सायंकाळी ५ वाजता चांदा क्लब ग्राऊंडवर श्रीराम नामस्मरणाच्या गिनेस वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ‘या कार्यक्रमासाठी ‘गिनेस’ने २०० अटी आणि नियम टाकून दिले आहेत. त्याचे भान आपल्याला ठेवायचे आहे. त्याचे प्रशिक्षण तुम्हाला मिळणारच आहे. कोणते वस्त्र परिधान करायचे, हे देखील ठरले आहे. एकसूत्रता दिसावी म्हणून महिलांना साडी आणि पुरुषांना शर्ट दिला जाणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर चांदा क्लब मैदानावर शिस्तबद्ध रीतीने अंथरलेल्या हजारो पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ हा अकरा अक्षरी मंत्र लिहिणार आहेत; हजारो पणत्यांनी सजवलेले हे भव्यदिव्य रामनाम आकाशातून अविस्मरणीय दिसणार आहे,’ असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
२१ जानेवारीला सकाळी ११ वाजता गिनेसच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्याचा सोहळा होईल. यावेळी बंगाली समाजाच्या भगिनी शंखनाद करतील. प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर सभागृहाच्या बाहेर ढोलताशाच्या गजरात जल्लोष होणार आहे असेही ते म्हणाले. २० जानेवारीला ‘एक्स’वर ‘सियावर रामचंद्र की जय’ हा जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा ट्रेंड राहील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. रामायणात उल्लेख असलेले जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. २१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता झरी येथे हा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता चांदा क्लब मैदानावर ज्येष्ठ अभिनेते पुनित इस्सार ‘रामनाट्य’ सादर करणार आहेत.
२२ जानेवारीला २० चौकांमध्ये भजन
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, पोंभूर्णा याठिकाणी २० चौकांमध्ये श्रीराम भजनाचे आयोजन होणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा आनंद सोहळा आपण सारे सभागृहात भव्य स्क्रीनवर बघून हा सोहळा हृदयात साठवायचा आहे. तिन्ही दिवस जिल्ह्यामध्ये स्पिकरवर रामधून वाजत राहणार आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
नेत्रदीपक आतीषबाजी
२२ जानेवारीला सायंकाळी क्लब ग्राऊंडला दिडशे ते दोनशे कलावंत रामकथेतील नाट्य, गीतरामायण आणि छोटे प्रसंग सादर करतील. रात्री ९ पर्यंत हा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर नेत्रदीपक आतषबाजी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
ज्योत प्रज्वलित करण्याचा मान
पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाचे शशी लखन सरवाम यांना मिळणार आहे. त्यानंतर दुसरी ज्योत केवट भोई समाजाच्या आशाताई दाते, तिसरी मुस्लीम समाजाच्या वतीने चांद पाशा सय्यद, चौथी अनुसूचित जातीच्या प्रियंका थूल, पाचवी आदिवासी समाजाच्या गीता गेडाम, सहावी शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा प्रज्वलित करतील. त्यानंतर सर्वांनी ज्योत प्रज्वलित केल्यावर लाईट्स बंद होतील आणि नयनरम्य दृष्य तयार होईल, असे ते म्हणाले.
चंद्रपूरकर असण्याचा आशीर्वाद
माझ्याकडे शांतीकुंजमधून गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या, डॉ. चिन्मय पंड्या मुंबईत भेटायला आले. या बैठकीत मुंबईत अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय झाला. सिडकोच्या सव्वाशे एकर जागेत २१ ते २७ जानेवारी या कालावधीत हा कार्यक्रम करण्याचे ठरले. जागेचे सव्वादोन कोटी रुपयांचे भाडेदेखील मुख्यमंत्र्यांनी माफ केला. पण योगायोग असा की, श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीचा दिवस निश्चित झाला. त्यामुळे आता २१ फेब्रुवारीला हा यज्ञ सुरू होईल. यासाठी जगभरातील गायत्री परिवाराचे हजारो लोक मुंबईत येतील. २ लक्ष फुटाचे १४ मंडप इथे असतील. प्राणप्रतिष्ठेनंतर यज्ञाचे आयोजन करण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे, हा चंद्रपूरकर असण्याचा आशीर्वाद आहे, अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
पंढरपूरमध्ये संकीर्तन सभागृह
जगातील एकमेव असे संकीर्तन सभागृह पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य मला लाभत आहे. चित्रपटाच्या मल्टिप्लेक्सप्रमाणे कीर्तनाचे मल्टिप्लेक्स साकारले जाणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. भीमाशंकर येथील शिव मंदिरात जाण्यासाठी ज्येष्ठांना, दिव्यांग बांधवांना त्रास व्हायचा. आता शंभर कोटी रुपये खर्च करून तिथे भाविकांची सोय होत आहे. त्याचप्रमाणे शिखर शिंगणापूरमधील महादेवाच्या पिंडावर वाहण्यासाठी बेलाची पाने मिळायची नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे मंदिर आहे. या गावात मी १२०० हून अधिक बेलाची झाडे लावली. आज बेलाच्या पानांनी गाभारा भरून जाईल एवढी झाडे याठिकाणी वाढली आहेत. तेथील संत मंडळी मला गेल्या आठवड्यात पुण्यात येऊन भेटली आणि आशीर्वाद दिले, याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.