Forest service is a service that inspires – Principal Secretary Venugopal Reddy
Convocation and passing out parade organized at Van Prabodhini
चंद्रपूर :- चंद्रपूर वन प्रबोधिनी ही वन्यजीव व्यवस्थापन व उत्पादन वानिकी या क्षेत्रातील राज्याची शिखर प्रशिक्षण संस्था आहे. या प्रबोधिनीमध्ये वन विभागातील विविध संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. येथे प्रशिक्षण घेतलेले सर्वजण उत्तम प्रशासक होतील आणि क्षमता बांधणीसह कौशल्य व आपल्या ज्ञानाचा उपयोग करून हवामान बदल, मानव वन्यजीव संघर्ष या भविष्याशी निगडीत आव्हानांचा सामना करतील. कारण वनसेवा ही प्रेरणा देणारी सेवा आहे, असे वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी सांगितले.
वन प्रबोधिनी येथे आयोजित दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यात आलेल्या 44 वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे 18 महिने कालावधीचे प्रशिक्षण येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यामुळे पासिंग आऊट परेडचे तसेच प्रमाणपत्र वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता बिश्वास, तसेच चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापनचे संचालक एम. एस. रेड्डी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या समारंभामध्ये प्रशिक्षण पुर्ण करून वन विभागामध्ये रुजु होण्यासाठी सज्ज झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कर्तव्याप्रती निष्ठा बाळगण्याची शपथ देण्यात आली.
वन प्रबोधिनीचे संचालक, एम. एस. रेड्डी म्हणाले, 22 ऑगस्ट 2022 पासुन 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यात आलेल्या 44 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे 18 महिने कालावधीचे प्रशिक्षण येथे आयोजित करण्यात आले. येथील प्रशिक्षणाबरोबरच भारतातील विविध 19 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेशातील अनेक वन व वन्यजीव व्यवस्थापनाचे दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले. या 44 प्रशिक्षणार्थ्यांपैकी 35 अधिकारी हे विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्रातुन 41 तर आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश व मिझोरम या राज्यातील प्रत्येकी एक अशा 44 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेऊन हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले.
याप्रसंगी बोलतांना वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन केले. तसेच जैवविविधता संवर्धन, अवनत वनजमिनी पुनःसंचयीत करणे, यासारख्या नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची सुचना केली. प्रशासकीय कौशल्य आत्मसात करून उत्तम प्रशासक होण्यासाठी वाचन, लेखन निरंतर सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या कालावधीत विविध विषयांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.