Election observers interact with citizens on Maharashtra-Telangana border
● मतदान केंद्राला भेट व पाहणी
चंद्रपूर :- 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या तयारीची पाहणी करण्याकरीता सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जीवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या मतदान केंद्राला यांनी भेट दिली. तसेच येथे कार्यरत कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला.
महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा, येसापूर, भेलापठार, लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा), शंकरलोधी, महाराजगुडा, कोठा (बु.), परमडोली, मुकदमगुडा आणि लेंडीजाळा या 14 गावांसाठी एकूण सहा मतदान केंद्र राहणार आहेत. यातील पुडीयालमोहदा आणि परमडोली या मतदान केंद्राला निवडणूक निरीक्षक श्री. जाटव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पोलिस पाटील व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. निवडणूक संदर्भात काही अडचण आहे का, दोन्ही राज्यासाठी मतदान करता का, मतदार माहिती चिठ्ठी मिळाल्या का, याबाबत त्यांनी नागरिकांना विचारणा केली. यावेळी जीवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, नायब तहसीलदार श्री. वाहने, तलाठी मेटलवार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या : महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील 14 गावांसाठी असलेल्या सहा मतदान केंद्रातंर्गत 2694 पुरुष मतदार तर 2423 स्त्री मतदार असे एकूण 5117 मतदार आहेत. यात पुडीयालमोहदा मतदान केंद्रातंर्गत एकूण 722 मतदार (पुरुष – 374, स्त्री – 348), कुंभेझरी मतदान केंद्रातंर्गत एकूण 1435 मतदार (पुरुष – 755, स्त्री – 680), भोलापठार मतदान केंद्रातंर्गत एकूण 831 मतदार (पुरुष – 436, स्त्री – 395), वणी (खु.) मतदान केंद्रातंर्गत एकूण 612 मतदार (पुरुष – 324, स्त्री – 288), महाराजगुडा मतदान केंद्रातंर्गत एकूण 301 मतदार (पुरुष – 152, स्त्री – 149) आणि परमडोली मतदान केंद्रांतर्गत एकूण 1216 मतदार (पुरुष – 653, स्त्री – 563) आहेत.