Educational trip of students from tribal ashram schools to ISRO (Bangarulu) by air
चंद्रपूर :- आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने प्रकल्पातील शासकीय, एकलव्य व अनुदानित आश्रमशाळांमधील विध्यार्थ्यांसाठी दिनांक 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही योजना जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक मंजुरीने राबविण्यात आली आहे.
या सहलीत 42 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि 4 कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी प्रवास करणार आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवास चंद्रपूर ते हैदराबाद ट्रेनने, तर हैदराबाद ते बंगळुरू विमानाने करण्यात येणार आहे. परतीचा प्रवासही विमानानेच होणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानाने प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याने त्यांच्यात विशेष उत्साह आणि कुतूहल दिसून येत आहे.
सहलीतील मुख्य ठिकाणे आणि उद्देश
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), बंगळुरूः विद्यार्थ्यांना उपग्रह तयार करण्याच्या विविध टप्प्यांबद्दल माहिती दिली जाणार आहे. यामध्ये उपग्रह तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, संशोधन प्रक्रिया, कच्चा माल, आणि उपग्रह अंतराळात कसे सोडले जाते याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामुळे विज्ञान विषयक आवड निर्माण होऊन संशोधन वृत्ती वाढेल आणि सृजनशीलता विकसित होईल.
म्हेसूर पॅलेस, म्हैसूरः विद्यार्थ्यांना म्हैसूर पॅलेसला भेट देण्यात येणार आहे. गाईडच्या माध्यमातून पॅलेसच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल माहिती दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची उत्तम समज होईल.
कुर्ग – भारतातील चहा आणि कॉफीचे मळ्यांसाठी प्रसिध्द असलेले ठिकाणास विद्यार्थ्यांना भेट देता येणार आणि त्या संबधित माहिती प्राप्त करता येणार.
विशेष वैशिष्ट्ये – ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आहे. शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त ठरेल.
कौतुकाची बाब – प्रकल्प कार्यालयाच्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारची विशेष शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. विमान प्रवास, ISRO आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार यांचे कौतुक होत आहे.
या सहलीसाठी मार्गदर्शन चंद्रपूर जिल्हाधिकारी मा. श्री. विनय गौडा जी. सी. आणि प्रकल्प अधिकारी श्री. विकास राधेलवार यांचे लाभले आहे.
चंद्रपूर प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या शैक्षणिक सहलीच्या आयोजनामागील उद्देश विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्थळांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि प्रेरणा मिळावी,
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि इतर ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळांना भेट देण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आणि इतिहासाची ओळख विद्याथ्यांना जागतिक दृष्टिकोन मिळवून देईल आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करेल असे मनोगत जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. यांनी यावेळी व्यक्त केले.