Don’t delay Vadha pilgrimage development work, publish tender within two months – MLA Kishore Jorgewar
चंद्रपूर :- 25 कोटी रुपयांच्या निधीतून वढा तीर्थक्षेत्राचा दैदिप्यमान विकास होणार आहे. हे केवळ एक विकासकाम नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे या विकासकामात दिरंगाई करू नका. शासन निर्णया प्रमाणे आराखड्याचे सनियंत्रण व अंमलबजावणीसाठी समित्या तयार करून दोन महिन्यांच्या आत कामाची निविदा प्रकाशित करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, या विकासकामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर सूचना दिल्या आहेत.
या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील, जलसंधारण विभागाचे सहायक अभियंता ओमकेश सांगळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी आर. बी. कोंडावार, घुग्घूस ठाणेदार एस. एस. सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, वढा सरपंच किशोर वराडकर, देवाळा उपसरपंच सुरज रामटेके, शंकर वराडकर, तालुका उपाध्यक्ष दयानंद नागरकर, तालुका प्रचार प्रमुख जय मिश्रा, गणपत कुडे, कार्तिक बोरेवार, आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे वढा तीर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रद्धेचे हे स्थान असल्यामुळे विकासकामे त्वरित आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. हे काम केवळ सरकारी निधीचे नसून, भाविकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी तत्परता दाखवावी, असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीतून मंदिर सभागृह, प्रशासकीय इमारत, पूजा शेड, घाट बांधकाम, छत्री, विसर्जन कुंड, जलनिस्सारण, बायोडायजेस्टर, बागकाम सह इतर सोयी-सुविधांद्वारे मंदिर परिसराचा विकास होणार आहे. यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
वढा येथे वर्धा आणि पैनगंगा नदीचा संगम आहे. दोन पवित्र नद्यांचा संगम हा धार्मिक दृष्टिकोनातून पावन आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारणे गरजेचे आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी याबाबत सातत्याने प्रयत्न केले आहेत. पंढरपूर आणि वढा या तीर्थक्षेत्रांमध्ये साम्य आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथे भरणाऱ्या यात्रेला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची योग्य सोय व्हावी यासाठी विकास कामाची निविदा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले आहेत. आराखड्यासाठी आवश्यकतेनुसार सल्लागार नियुक्त करण्यात यावा, आराखड्यातील कामांची तात्काळ तांत्रिक मान्यता घेण्यात यावी आदी सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून मंदिर परिसराचा दैदिप्यमान विकास होणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी 44 कोटी रुपयांचा प्रस्ताव आपण सादर केला आहे. यातील पहिल्या टप्यात 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आपल्याला यश आले आहे. दुस-या टप्यातील निधीसाठीही आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या टप्यात वढा ते जुगाद असा हलता पुल तयार करण्याचे प्रस्तावित असुन हे कामही आपण लवकरच करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. भाविकांच्या सोयीसाठी आणि श्रद्धेच्या दृष्टीकोनातून हे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.