Development of villages is my resolve ! Determination by Sudhir Mungantiwar
◆ वरोरा तालुक्यातील भटाळा येथील गावकऱ्यांनी मानले आभार
चंद्रपूर :- एखाद्या गावाचे समाधान करण्यासाठी फक्त आश्वासन देऊन मी थांबत नाही. एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो आणि एवढेच नव्हे तर संकल्प करून विकासाच्या प्रवाहात ते गाव सामील करून घेतो. कारण आदर्श गावांचे निर्माण, हाच माझा संकल्प असतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दि.१९ मार्च (मंगळवारी) केले.
वरोरा तालुक्यातील भटाळा येथील श्री महादेव मंदिराला व ऋषी तलावाकरिता ३ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून देत गावाच्या प्रगतीची दारे उघडून दिली. याबद्दल स्थानिक जनतेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित भव्य जाहीर सभेत ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते, वरोरा विधानसभाप्रमुख रमेश राजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास राजूरकर, श्री. डॉ. गायकवाड, श्री. बंडू लभाने, सुनील गायकवाड, जिल्हा महामंत्री राजूभाऊ गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य वंदनाताई दाते, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रविंद्र भोयर, चंद्रकांत कुंभारे, नामदेव डाहुले, नरेंद्र जीवतोडे, रोहिणीताई देवतळे, अंकुश आगलावे, विजय राऊत, सुरेश महाजन, सिकंदर शेख, ओमप्रकाश मांडवकर, अमित गुंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘भटाळा गावासाठी काहीतरी करण्याची मनापासून इच्छा होती आणि योगायोग असा की दीड महिन्यातच मला या गावात येऊन आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या गावाच्या विकासासाठी, भगवान महादेवाच्या सेवेसाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली. भटाळा हे गाव आदर्श करण्यासाठी माझे प्राधान्याने प्रयत्न असतील,’ अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे. गरीब आणि कष्टकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील माणूस कसा सक्षम होईल, शेतकरी कसा संपन्न होईल, महिला आणि बेरोजगार यांच्यासाठी स्वयंरोजगाराची दारे कशी उघडली जातील यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. गोरगरीब जनतेच्या आणि कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंद दिसावा, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, उत्तम व सुलभ आरोग्य सेवा मिळावी यासाठी माझे सतत प्रयत्न असतात. हे करताना जात-पात, धर्माचा कधीच विचारही केला नाही. जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांनी जो विश्वास माझ्यावर आतापर्यंत टाकलाय तो सार्थ ठरविणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे.’
फक्त विकासाचा विचार
महाराष्ट्र राज्यात आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना मी केवळ विकास आणि विकासाचा विचार करत गेलो. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आता मला देशात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपण मला साथ द्यावी आणि माझ्यासोबत राहावे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
विकास कामावर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश
नथुजी मोहूर्ले, गणपत ठाकरे, चंदन लीलाटे, मोहन लीलाटे, रामदास तोडासे, शिवराम श्रीरामे, आकाश सहदिवे, निखिल आसुटकर, गौरव दमाटे, मनोज दमाटे, मोहित काळे यांनी भाजपात प्रवेश केला.