Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeChief Ministerमुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर वृद्धांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर वृद्धांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना

7 proposals of Chief Minister Vyoshree Yojana eligible
Eligible senior citizens above 65 years will get one time lump sum of Rs.3 thousand

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, तसेच वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता पात्र वृध्द नागरिकांनी सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत 65 वर्षे व त्यावरील पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकताच घेतला. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखााली असलेल्या समितीकडे सादर करण्यात आलेल्या 10 प्रस्तावांपैकी 7 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून 2 प्रस्ताव त्रृटी पुर्ततेकरीता तर 1 प्रस्ताव 65 वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरीता लाभार्थ्यांच्या वयाचा पुरावा म्हणून केवळ आधारकार्ड ग्राह्य न धरता त्यासोबत राशनकार्ड, मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक पुरावा जोडणे आवश्यक राहील. तसेच उत्पन्न पुराव्याबाबत पिवळे किंवा केशरी राशनकार्ड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

बैठकीला सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बाबासाहेब देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत व इतर अधिकारी उपस्थित होते.

योजनेचे स्वरुप : पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपाड स्टिक, व्हील चेयर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना लाभ देणे आवश्यक आहे. या योजनेकरीता नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत निधीचे वितरण लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्यात करण्याऐवजी लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एकवेळ एकरकमी 3 हजार रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष : 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 2) 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण असावीत. 3) सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याचे स्वयंघोषणापत्र आवश्यक. 4) पात्र लाभार्थ्यांना निधी वितरीत झाल्यावर उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करावे.

उत्पन्न मर्यादा : लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.

आवश्यक कागदपत्रे : 1) आधार कार्ड/ मतदान कार्ड, राशनकार्ड, 2) राष्ट्रीयकृत बॅकेची बँक पासबुक झेरॉक्स 3) पासपोर्ट आकाराचे 2 फोटो 4) उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले) 5) उपकरण/साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले).

येथे करा संपर्क : योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular