Saturday, April 26, 2025
HomeSportछत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी...

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण

Chhatrapati Sambhaji Maharaj postage stamp unveiled by Guardian Minister Sudhir Mungantiwar on Thursday.                               Rare letters of Chhatrapati Shivaji Maharaj will also be published

◆ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन

चंद्रपूर – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या दि.०७ मार्च (गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण होणार आहे. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले जात आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण होणार आहे. याशिवाय मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड-१, ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज, ‘महाराष्ट्र – गोंड समुदाय’ हे महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर यांचेही प्रकाशन या सोहळ्यामध्ये होणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, माँ जिजाऊ यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचे प्रकाशन झालेले आहे. याशिवाय श्री. मुनगंटीवार यांनी अधिवेशनात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर होण्यासाठी तत्कालीन सरकारसमोर मागणी लावून त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी कार्य पूर्णत्वास येणार असल्याची भावना श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्याभिषेक सोहळा अन् अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविले 
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे ऐतिसाहिक वारसा आणि परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करताना सांस्कृतिक कार्यक्रमांसह ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पुढाकार घेतला. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. ५ नोव्हेंबर २०२२ ला हे अतिक्रमण हटविण्यात आले. आग्रा येथील किल्ल्यामध्ये १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात साजरी करण्यात आली. २ जून २०२३ ला रायगडावर साजरा झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याची जिद्द त्यांनी बाळगली. सातत्याने पाठपुरावा करून ब्रिटन सरकारसोबत त्यांनी सामंजस्य करार देखील केला. यासोबतच जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे मराठा इन्फन्ट्री सैन्य दलाच्या सहकार्याने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार धरलेल्या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले.

आणि दांडपट्टा ‘राज्यशस्त्र’ झाले
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. १९ फेब्रुवारी २०२४ ला पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण श्री. मुनगंटीवार यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून अलीकडेच घोषित केला. याशिवाय रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर आदी कल्पक कामे सुधीर मुनगंटीवार पुढाकाराने करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular