BJP’s Union Party Membership Registration Campaign
चंद्रपूर :- 5 जानेवारीपासून भाजपा चंद्रपूर महानगरतर्फे आयोजित सदस्यता नोंदणी महाअभियान रॅलीद्वारे सुरू होत आहे. पक्षकार्य वाढावे, प्रत्येक बुथवर किमान 250 सदस्यता नोंदणी व्हावी, हा उद्देश घेऊन सर्व कार्यकर्ते कामाला लागणार आहेत.
भाजपात श्रेणीकरण हे कधीही कार्यकर्त्याचे होत नसते, ते बुथचे होते. पक्षात कार्यकर्त्याला सर्वात मोठे स्थान आहे. प्रत्येक बुथ मजबूत व्हावे हे पक्षाचे सहज व नित्य कार्य आहे. आज कमजोर असलेले बुथ उद्या मजबूत होणार आहे. किंबहुना, त्यासाठीच बुथचे श्रेणीकरण केले जाते, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल पावडे यांनी व्यक्त केले.
माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात रविवार, 5 जानेवारीला सदस्यता नोंदणीचा शुभारंभ तीन वेगवेगळ्या रॅलीच्या माध्यमातून होणार आहे. गांधी चौक (संडे मार्केट) येथून निघणार्या रॅलीचे नेतृत्त्व आमदार किशोर जोरगेवार करतील. तर तुकूम (एसटी वर्क शॉप चौक) येथील रॅलीचे नेतृत्व भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे तसेच बंगाली कॅम्प चौक येथून निघणार्या रॅलीचे नेतृत्व भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत करणार आहेत.
वेगवेगळ्या वेळेत या रॅलींचे नियोजन करण्यात आले आहे. महानगरातील प्रत्येक प्रभागात सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व पदाधिकारी यांच्याद्वारे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.
पदाधिकार्यांनी प्रत्येक बुथवर किमान 250 सदस्य नोंदणी करणे अपेक्षित आहे. प्रत्येक बुथवर नेमलेले पदाधिकारी बुथवर जावून, बैठक घेऊन सदस्य नोंदणी करणार आहेत. ‘सी’ बुथ ‘बी’वर आणण्याकरिता, ‘बी’ बुथ ‘ए’वर आणण्याकरिता व ‘ए’ बुथ आणखी मजबूत करण्याकरिता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कार्य करणार आहेत.
6 जानेवारीपासून प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या चार ठिकाणी, चार दिवस नोंदणी स्टॉल लावून सदस्यता नोंदणीचे महाअभियान राबविले जात आहे. 7 ते 10 जानेवारीपासून प्रत्येक मोर्चाद्वारे (महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचीत जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा व सर्व प्रकोष्ठ/सेल अशा) त्या-त्या क्षेत्राशी निगडीत सदस्यता या महाअभियान मोहिमेद्वारे होणार आहे, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.