‘Ashi Pakhre Yeti’ entered the final round of the Labor State Drama Competition with 6 prizes
चंद्रपूर :- ६९ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत कामगार कल्याण केंद्र मुल रोड चंद्रपूर यांनी सादर केलेल्या विजय तेंडुलकर लिखित पंकज मलिक दिग्दर्शित अशी पाखरे येती या नाटकाने सांघिक तृतीय पारितोषिकासह ६ पारितोषिके प्राप्त करत कामगार राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
या नाटकाने नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देखील सांघिक तृतीय पारितोषिक पटकावले आहे. कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सांघिक तृतीय पारितोषिकासह पंकज मलिक यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तृतीय , हेमंत गुहे यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना तृतीय , अंकुश राजूरकर यांना सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय तर उत्कृष्ट पुरुष अभिनयाचा गुणवत्ता पुरस्कार तुषार चहारे आणि उत्कृष्ट स्त्री अभिनयाचा गुणवत्ता पुरस्कार समृद्धी कांबळे यांना जाहीर झाला आहे.
या नाटकात तुषार चहारे , सौ विशाखा देशपांडे , समृद्धी कांबळे , बबन राखुंडे, सूरज उमाटे , अक्षय मेश्राम, बाल कलाकार निश्चय मुळावार ,अमृता मुळावार यांनी भूमिका अभिनित केल्या आहेत. नाटकाचे निर्माते रविंद्र वांढरे असून तेजराज चिकटवार , पंकज नवघरे, श्रीनिवास मुळावार यांनी देखील निर्मिती प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले आहे.
या नाटकातील सर्व कलावंत नाट्य प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी असून या आधी भर चौकात गांधी पुतळ्यासमोर , वृंदावन या नाटकात या कलावंतांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.अशी पाखरे येती नाटकाच्या विजयी चमूने २७ डिसेंबर रोजी नागपुरात सिने अभिनेते देवेंद्र दोडके , नरेंद्र शिंदे , सहा . कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांच्या हस्ते सांघिक व वैयक्तिक पारितोषिके स्वीकारली.यावेळी स्पर्धेचे परीक्षक विकास फटींगे , लक्ष्मण जाधव आणि श्रीमती प्रियंका ठाकूर यांचीही उपस्थिती होती.